मसूर- किवळ रस्त्यावरील खोकीधारकांना अन्यायकारक नोटीसा : न्यायालयात जाण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा


मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूर ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाला हाताशी धरून मसूर- किवळ जिल्हा मार्गामध्ये एकाच बाजूकडील खोकीधारकांना रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण होत असल्याच्या कारणावरून जाणीवपूर्वक दिलेल्या नोटिसा अन्यायकारक आहेत. उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या पोटावर मारून विकास करण्यापेक्षा या मार्गाचा नकाशा प्रमाणे आपली हद्द कायम करून अतिक्रमण काढावे. अन्यथा तोंडे पाहून खोकी धारकावर अन्याय करणार असाल तर प्रसंगी न्यायालयात न्याय मागू असा इशारा मसूर – किवळ रस्त्याकडील मसूरच्या यशवंत खोकीधारक संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेत दिला. यावेळी वामन शिरतोडे, संजय जाधव, गणेश नळगुणे, सुरेश निकम, मानसिंग पाटोळे, संतोष पारवे, अमोल काशीद, चंदू मुलांनी यांच्यासह अन्य खोकेधारक उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना खोकीधारक म्हणाले, मसूरच्या उत्तर बाजूला मसूर -किवळ रोड लगत छोट्या व्यावसायिक धारकांची 35 खोकीधारक 40 वर्षापासून वडीलार्जीत व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. सामान्य जनतेचे संसार उध्वस्त होणार आहेत. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु जे काय चाललेले आहे ते आकसापोटी सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मसूर ग्रामपंचायतीने बांधकाम खात्याला हाताशी धरून अतिक्रमणाच्या नावाखाली ठराविक एकाच बाजूकडील लोकांना दिलेल्या नोटिसा अन्यायकारक आहेत. दुसऱ्या बाजूला नोटीस का नाहीत? हा जिल्हा मार्ग असून बांधकाम खात्याने साडेबारा मीटरची हद्द धरून आठ दिवसात खोकी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. वस्तूता खोकी धारकांनी कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. मसूरचे नवीन गावठाण स्थापित झाले, त्याच हद्दीत ही खोकी आहेत. परंतु बांधकाम खात्याने कोणाचे तरी ऐकून ठराविकच खोकीधारकांना काढलेल्या नोटीसामुळे संभ्रम निर्माण केला आहे. जिल्हा मार्गाला राज्यमार्गाचा नियम कसा काय? असा सवाल करून बांधकाम खात्याने किवळ- मसूर रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील आपली हद्द नकाशाप्रमाणे कायम करून जे अतिक्रमण असेल ते काढावेत असे स्पष्ट करावे. सध्या मसूर – किवळ उत्तर बाजूला रस्ता रुंदीकरणाचे किंवा डांबरीकरणाचे कसले प्रयोजन नाही. कोणता निधी पडलेला नाही. खोकी काढण्याचे सबळ कारण नसताना जाणीवपूर्वक खोकीधारकावर अतिक्रमणाच्या नावाखाली अन्याय कशासाठी? अनेकांची उदरनिर्वाहाची साधने उध्वस्त करून विकास साधणार आहात का? असे सवाल अन्यायग्रस्त खाकीधारकांनी उपस्थित केले. यापूर्वी 2020 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे नोटीस आल्या होत्या त्या यशवंत खोकीधारक संघटनेने संघटितपणे लढा उभारून संबंधितांना चोख उत्तर दिले होते.
खोकीधारकांच्या समस्या सोडवणाऱ्याच्याच पाठीशी ठाम राहू
स्थानिक लोकप्रतिनिधींना सामान्य जनतेच्या सुखदुःखाचे काय देणे- घेणे नसल्याचे दिसते. त्यांना आम्ही योग्य वेळी जागा दाखवू. उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्यांचे अतिक्रमणाच्या विळख्यात बळी जाणार असतील व अशावेळी अन्यायकारक खोकीधारकांच्या पाठीशी कोणी राहत नसेल तर भविष्यात आम्हा खोकीधारकांच्या समस्या जो पदाधिकारी सोडवून आम्हाला न्याय देऊन दिलासा देईल. अशाच खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी यशवंत खोकीधारक संघटना राहील असा ठाम निर्धार व्यक्त केला.



