उंब्रजला हायवेवर दारूसाठी मारहाण करून लुटमार : रेकॉर्डवरील गुन्हेगार 24 तासात जेरबंद

कराड | शिवडे (ता. कराड) गावचे हद्दीत पुणे- बेंगलोर हायवे लगतचे हॉटेल विसावा परमिट रूम बिअर बारचे समोर दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून लाथाबुक्यांनी व दगडाने दोघांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर उंब्रज पोलिसांनी अवघ्या 24 तासात तीन्ही आरोपींना जेरबंद करण्यात उंब्रज पोलिसांना यश आले. या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात राज शिवाजी हजारे, सुरज भगवानसिंग हजारे, राकेश ऊर्फ मुन्ना जालिंदर घाडगे (सर्व रा. उंब्रज, ता. कराड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवडे गावच्या हद्दीतील विसावा हाॅटेल समोर आकाश प्रभाकर पवार (रा. उंब्रज, ता. कराड) यांना व त्यांचा मित्र विवेक देशमुख यांना दारु पिण्यासाठी पैसे दे असे म्हणुन संशयित तीघांनी लाथाबुक्याने व दगडाने मारहाण केली. तसेच फुटलेली बाटली पोटात खुपसून जिवे मारीन अशी भिती दाखवून आकाश पवार यांचे पॅन्टच्या खिशातील 1 हजार रुपये व मोबाईल फोन जबरदस्तीने घेवून पसार झाले. संशयित तिघेही रेकॉर्ड वरील आरोपी आहेत. डी. बी. पथकाने एक आरोपीस कराड रेल्वे स्टेशन येथून व दुसरा आरोपी सातारा येथून ताब्यात घेतला. ताब्यातील दोन्ही आरोपींच्याकडील माहितीवरून तिसऱ्या आरोपीस ताब्यात घेणेत आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक, महेश पाटील, पोलीस उपिनीक्षक अनिल पाटील, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ. राजकुमार कोळी, पो. कॉ. गणेश कुंदे, पो. कॉ. सागर साळे, सायबर शाखेचे पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड नागेश पाटील यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपिनीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.