पाटण बाजार समिती अपहार प्रकरण :- सचिवास 3 दिवस पोलीस कोठडी

पाटण,:- पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अपहारप्रकरणी ताब्यात घेतलेल्या सचिव हरिष बंडू सुर्यवंशी (रा. पाटण) यांना पाटण येथील न्यायालयात हजर केले असता शनिवार दि. १७ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, उर्वरीत गुन्हा दाखल असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करणार असल्याची माहिती मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे सपोनि चेतन मछले यांनी दिली.
याबाबत मल्हारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या ३० लाख ३२ हजाराच्या अपहार प्रकरणी बुधवार दि. १४ रोजी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी संस्थेचे तत्कालिन सभापती, उपसभापतीसह अन्य १५ संचालक व ३ कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर संस्थेचे सचिव हरिष बंडू सुर्यवंशी (पाटण) यांना मल्हारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याची फिर्याद लेखापरिक्षक रमेश किसन बागुल यांनी मल्हारपेठ पोलिसात दिली होती.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले संस्थेचे सचिव हरिष बंडू सुर्यवंशी यांना मल्हारपेठ पोलिसांनी गुरूवार दि. १५ रोजी पाटण न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवार दि. १७ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उर्वरीत पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल असल्याने त्याबाबत योग्य पध्दतीने तपास सुरू आहे. त्यांच्यावरही टप्याटप्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती सपोनि चेतन मछले यांनी बोलताना दिली.