कुस्ती दंगल : कराडची अंजली वेताळ थायलंडमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

सातारा : कराड तालुक्यातील सुर्ली गावची कन्या अंजली संतोष वेताळ हिने राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये पार पडलेल्या १५ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीत अंजलीने ६२ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत ही उल्लेखनीय कामगिरी केली. या दिमाखदार यशामुळे अंजलीची थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कराड तालुक्यासाठी तसेच सातारा जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे. सुर्लीसारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या अंजलीने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. सध्या ती लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय साई कुस्ती संकुलामध्ये नियमित प्रशिक्षण घेत असून तिच्या खेळातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे तिने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंजली ही हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांची कन्या असून कुस्तीचे बाळकडू तिला घरातूनच मिळाले आहे. स्पर्धेपूर्वी झालेल्या शारीरिक दुखापतीवर मात करत तिने अविश्वसनीय जिद्द दाखवली. कठोर सराव, मानसिक ताकद आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तिने निवड चाचणीत सुवर्णपदक पटकावत आशियाई स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. ग्रामीण भागातील मुलींसाठी अंजलीचे यश प्रेरणादायी ठरत असून क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी चिकाटी, समर्पण आणि मेहनतीला पर्याय नसल्याचे तिने सिद्ध करून दाखवले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंजलीच्या या सुवर्ण यशाबद्दल माजी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, साईचे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, प्रशिक्षक दादासो सुलवटे, दयानंद खतकर, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, पंचायत समितीच्या उपसभापती अनिता वेताळ यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कराड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या अंजलीकडून आता थायलंडमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेतही भारताला पदक मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



