मलकापूरात पतीने चाकूने वार करून पत्नीची केली हत्या

कराड ः- कराड शहरातील डुबल नगर परिसरातील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्री कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दत्तात्रय नारायण जांभळे (वय अंदाजे ३५) असे संशयित पतीचे नाव असून, रोहिणी दत्तात्रय जांभळे असे मृत पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास दत्तात्रय व रोहिणी यांच्यामध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी दत्तात्रय याने चाकूने रोहिणी यांच्यावर वार केल्याचे समोर आले. गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, निखील मगदूम, अशोक भापकर यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून, खुनामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. संशयित पती दत्तात्रय जांभळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.



