आगाशिवनगरला मध्यरात्री जुन्या वैमनस्यातून स्कॉर्पिओ अंगावर घालून दोघांना चिरडण्याचा प्रयत्न


कराड :- आगाशिवनगर येथील देवकर कॉलनी परिसरात जुन्या वैमनस्यातून स्कॉर्पिओ अंगावर घालून दोन युवकांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अक्षय संजय मोकाशी (वय ३२, रा. आगाशिवनगर) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास देवकर कॉलनी परिसरात काही युवकांमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी अक्षय मोकाशी तेथे गेले होते. त्यानंतर सर्वजण घरी जाण्याच्या तयारीत असताना काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (एमएच-५०-झेड-१००६) तेथे आली. फिर्यादीनुसार, संशयित रोहित अर्जुन पोळ याने जुने वैमनस्य आणि रोहित लाखे याच्याशी असलेल्या वादाच्या कारणावरून स्कॉर्पिओचा वेग वाढवत ती गाडी अक्षय मोकाशी व रोहित लाखे यांच्या अंगावर घातली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले. अक्षय मोकाशी यांच्या खांदा, हात, गुडघे आणि चेहऱ्यास दुखापत झाली.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमागे दोन्ही गटांतील जुने वैमनस्य असल्याची चर्चा परिसरात असून, काही वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळल्याचे बोलले जात आहे. कराड शहर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



