कराड (हॅलो न्यूज) – सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याने शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना सेमी इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळत असून, तालुक्यातील 300 पैकी तब्बल 200 शाळा आता सेमी इंग्रजी माध्यमाच्या होणार आहेत. या उपक्रमामुळे राज्यभरात ‘कराड पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य संग्राम बाबा पवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मोठे यश मिळत असून सर्व सदस्यांनी एकमताने ठराव मंजूर केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि स्पर्धात्मक शिक्षण मिळावे, यासाठी कराड पंचायत समितीने मोठा निर्णय घेतला आहे. पंचायत समितीच्या मासिक सभेत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांना सेमी इंग्रजी माध्यमात करण्याची मागणी करण्यात आली होती. या निर्णयानंतर अवघ्या एका महिन्यात 100 शाळांनी सेमी इंग्रजीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. आता तालुक्यातील 300 पैकी 200 शाळा सेमी इंग्रजी माध्यमाच्या होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी पंचायत समिती सदस्य, शिक्षण विभाग आणि अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रयत्न सुरू केले आहेत.
फक्त शाळांचे माध्यम बदलून न थांबता, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी तालुक्यातील सुमारे 900 शिक्षकांना इंग्रजीचे विशेष प्रशिक्षण देण्याची तयारीही सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
नंदाताई यादव, सभापती, कराड पंचायत समिती
आमच्या कराड पंचायत समितीचे व तालुक्याचे नाव राज्याच्या नकाशावर आणण्याचा व कराड पॅटर्न राज्यात आदर्शवत ठरेल, असा विश्वास आहे. शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील शाळा दर्जेदार ठरल्यास मराठी शाळा टिकण्यास मदत होईल.
अनिता वेताळ, उपसभापती, कराड पंचायत समिती
खासगी शाळांकडे वाढता ओढा लक्षात घेऊन मराठी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांनी सांगितले. गावातील शाळाच सेमी इंग्रजी होत असल्याने पालकांनी पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
संग्रामबाबा पवार, पंचायत समिती सदस्य, कराड
कराड तालुक्यातील हा उपक्रम आता राज्यासाठी आदर्श ठरत असून, पुढील वर्षभरात तालुक्यातील 100 टक्के मराठी शाळा सेमी इंग्रजी करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
बिपीन मोरे, गटशिक्षणाधिकारी, कराड पंचायत समिती